वाढता वाढता वाढे…लठ्ठपणा आणि होमिओपॅथी

Share


सप्रेम नमस्कार,

होमिओपॅथी सर्वांसाठी ह्या लेखमालेत आज नवीन विषयासह तुम्हा सर्वांचे स्वागत. सर्वसाधारणपणे सर्वच वयोगटातील व्यक्तींना भेडसावणारा आणि महिला वर्गासाठी चिंतेचा असलेला विषय म्हणजे वाढते वजन किंवा लठ्ठपणा. जुने कपडे आता बसत नाही, किती पण व्यायाम करा वजन का आकडा जरा सुध्धा हलत नाही, किती पण कमी जेवा पोटाचा घेर काही केल्या कमी होत नाही, वजन कमी करण्यासाठी काही तरी द्या डॉक्टर असे सांगणारे अनेक जण भेटतात. वजन कमी करण्यासाठी काहीपण खाण्याची त्यांची तयारी असते पण काय कसे आणि किती ह्याची योग्य ती माहिती नसते. आज सदर लेखाच्या माध्यमातून आपण लठ्ठपणा ह्याविषयी जाणून घेऊयात. शरीरात वाढणारा मेद अर्थात चरबी पर्यायाने वाढलेले वजन जेंव्हा आरोग्य समस्या निर्माण करतात त्याला आपण लठ्ठपणा असे म्हणतो. चरबी ही एका विशिष्ठ प्रकारच्या पेशीमध्ये साठविली जाते. अतिरिक्त चरबी वाढल्याने चरबी साठविनाऱ्या पेशींचा आकार वाढतो आणि वाढणाऱ्या चरबीचा साठा करण्यासाठी पेशींची संख्याही वाढते. सामान्यतः पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये चरबीचे प्रमाण अधिक असते. आनुवंशिकता, सदोष जीवनपद्धती, सदोष आहार, औषधांचा दुष्परिणाम, व्यायाम आणि शारीरिक कष्टाचा अभाव ताणतणाव, नैराश्य, ग्रंथी विकार व त्यामुळे होणारा संप्रेरकांचा अभाव ( होर्मोनल एम्बा लंस ), लठ्ठपणा होण्याची ही काही महत्वाची करणे. वाढत्या चरबीचे शरीरात फ्री फॅटी अँसिड चे प्रमाण वाढते, ज्याचा ताण यकृतावर येतो आणि इन्सुलिन चा योग्य उपयोग न झाल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते. रक्तवाहिन्यांच्या आत चरबी साठल्याने हृदयरोग जडतो. पचनसंस्थेत बिघाड होतो. अतिरिक्त वजनाचा ताण सांधे विशेषतः गुडघे आणि घोट्यांवर येतो त्यामुळे हालचाल करण्यावर बंधने येतात आणि ही कमी झालेली हालचाल वजन वाढीसाठी हातभार लावते. वजन कमी करण्यासाठी धडपड करणाऱ्यांना आहारावर नियंत्रण किंवा भूकमार एवढेच गणित माहित असते. किती दिवसात किती किलो कमी होणार ह्या हिशेबात ते अडकलेले असतात. त्या सर्वांना मला सांगावेसे वाटते की वजन काट्यावर कमी दिसणारा आकडा हे लठ्ठपणा मोजणीचे एकमेव परिमाण नाही. सर्वप्रथम आपण हे लक्षात घेवू की चरबी ( फॅट्स) स्नायू ( मसल्स) हे दोन घटक वजन नियंत्रणाच्या क्रियेत सहभागी असतात. वाढलेल्या गलेलठ्ठ चरबी च्या खाली कमजोर आणि दबलेले स्नायू असतात. वजन कमी करण्यासाठी भूक मारून उपाशी राहिले तर पोषणाअभवी स्नायू अधिकाधिक कमजोर होवू लागतात आणि एखाद्या नवीन आजाराला आमंत्रण देऊ शकतात. तसेच खूप वेळ पोट रिकामे राहिल्याने शरीरातील साखर कमी होत जाते आणि अशा वेळी जेवणातून मिळालेले साखर ही पुन्हा चरबीच्या स्वरूपात साठविली जाते. त्यातून सुटका होण्यासाठी अनेक जण वेगवेगळे डाएट प्लॅन फॉलो करतात दिसतात. दिवेकर की दीक्षित ह्या संभ्रमात असलेले अनेक जण असतात. ह्या गोंधळातून बाहेर पडून काही सोप्या गोष्टी करता येवू शकतात. परंतु त्यात सातत्य राखणे फार महत्वाचे आहे. सर्वप्रथम योग्य आहार आणि परिणामकारक व्यायाम ह्यांची सांगड घालता आली पाहिजे. साधे सोपे नियम पळता आले पाहिजे. आपल्या आधीच्या पिढीने खाल्लेले धान्य प्रकार हे आपल्या शरीराला चांगल्या प्रकारे मानवतात. एका माणसाला लागू पडलेला डाएट प्लॅन दुसऱ्या माणसाला पण तंतोतंत लागू पडत नाही. आपल्या शरीराची ठेवण, आपल्या कामाची पद्धत, त्याचे स्वरूप, पचनक्रिया, इतर आजार ह्या सर्व गोष्टींचा विचार करून आहार नियोजन करावे लागते. म्हणून कुठलाही ढोबळ तक्ता मी इथे दिला नाही. शरीराला अन्न स्वरूपात मिळणाऱ्या साखरेचे विघटन आणि वापर जर योग्य पद्धतीने झाला तर लठ्ठपणाची समस्या बरीच कमी होईल. होमिओपॅथिक औषधे ह्या प्रक्रियेत चरबीचे लवकरात लवकर विघटन होण्यासाठी मदत करतात. प्रत्येक व्यक्तीची जीवनशैली बघून औषधांचे नियोजन करता येते. फायटोलाका, फ्युकस, कल्केरिया, ग्राफाईट, पलसेटीला सारखी अनेक औषधांचा पर्याय निवडता येतो. मुळात लठ्ठपणा होण्याची कारणे लक्षात घेवून प्रत्येक व्यक्तीसाठी वेगळा आहारतक्ता आणि वेगळे औषध द्यावे लागते. योग्य आहार, पुरेसा आणि परिणामकारक व्यायाम आणि गरज पडल्यास औषधांची मदत आपणास लठ्ठपणा पासून दूर ठेवू शकतात.

वाढत्या वजनाला वेळीच लगाम घाला, स्वस्थ रहा.

कळावे, लोभ असावा.

डॉ. सौ. नीलम गायकवाड.
एम. डी. ( होमिओपॅथी )
एम.एस. ( कौंसेलिंग )