व्हेक्टर ग्राफिक्सद्वारे छत्रपतींचा जीवनपट ‘धगधगते शिवपर्व’ साकारणार युवा कलाकार- संदीप घोडके

Share

अहमदनगर जिल्ह्यातील अकोले गावाचा मूळचा रहिवासी असलेला संदीप घोडके हा युवक लहानपणापासूनच आपल्या उपजत कलेचा म्हणजेच चित्रकलेचा प्रेमी म्हणता येईल.हातात जशी पाटी-पेन्सिल पडली तेव्हापासूनच जमेल तसा हात वळवून रेखाटनाला सुरुवात केली म पुढे तो प्राथमिक शाळेतील फळा असो वा चित्रकलेचा पांढरा कागद ! छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा लहान असतानाच पडलेला प्रभाव आणि त्यातूनच लहान असतानाच त्यांना रेखाटन्याचा केलेला प्रयत्न ही नव्या वाटचालीची एक सुरुवातच म्हणता येईल. पुढे हेच धगधगते शिवपर्व आपल्या व्हेक्टर ग्राफिक्स द्वारे शिवप्रेमींसमोर मांडण्याचा त्याने अनोखा प्रयत्न केला. स्वतःची वेगळी वैशिष्टपूर्ण कला दाखवण्याचा ह्या त्याच्या प्रयत्नात त्याने तीन वर्षात तब्बल ७५ व्हेक्टर चित्रे काढली. हा त्याच कलेचा एक प्रवास!

संदीप दिनेश घोडके याचे दहावी पर्यंतचे शिक्षण अकोले येथील अगस्ति विद्यालयात पूर्ण झाले. संदीपला बालपणापासूनच कलेची देणगी भेटली होती. वेगवेगळी चित्रे काढणे हा त्याचा आवडता छंद.घरात व गणपती मंडळांमध्ये सजावट करताना संदीप कायम पुढे असायचा. यातूनच संदीपला लोकांची कौतुकाची थाप मिळायची.

यातूनच करियर कडे पाहताना संदीपने अनिमेशन चा मार्ग निवडला व नंतर स्वतःच फ्रीलान्स करू लागला. यातच त्यांच्या कलेला मार्गदर्शन मिळत गेले, अनुभव वाढत गेला आणि लहान असतानाच ठरवलेली गोष्ट सतत डोळयांसमोर दिसू लागली ..ती म्हणजे महाराजांची चित्रे तीही स्वतःच्या वेगळ्या शैलीतून. आणि यासाठीचे प्रयत्न चालू झाले. यात संगणक आणि आयपॅड चा वापर करून त्याने व्हेक्टर चित्रे आणि एलुस्ट्रेशनस साकारायला चालू केली.संदीपने एलुस्ट्रेशन द्वारे साकारलेल्या व्यक्तिचित्रांची यादी खुप मोठी आहे. संत ज्ञानेश्वर, तुकारामांसह सर्व संतमंडळी, श्री पांडूरंग, छत्रपती शिवाजीमहाराज, संभाजी महाराज,राजर्षी शाहू महाराज, यांसारखे थोर व्यक्तिमत्व तसेच राजकिय क्षेत्रातील बाळासाहेब ठाकरे, शरद पवार ,छत्रपती संभाजी राजे, छत्रपती उदयनराजे भोसले, उध्दव ठाकरे, राज ठाकरे या सारख्या असंख्य मान्यवरांची व्यक्तिचित्रे एलुस्ट्रेशन द्वारे संदीपने रेखाटली आहेत.

व्हेक्टर चित्रांबद्दल बोलायचे म्हटले तर शिवजन्मापासून ते शिवरायांचे निधन म्हणजेच समाधीपर्यंत १६३० ते १६८० या कालखंडात घडलेल्या शिवरायांच्या अनेक घटना व पराक्रमांचा जीवनपट ७५ पेंटिंग मध्ये त्याने साकारला आहे. शिवनेरी ते रायगड, असे चित्रमय शिवचरित्र रेखाटणाऱ्या संदीप याने शिवजन्म, स्वराज शपथ, युद्धकला, शिक्षण, युद्धप्रसंग, शिवराज्याभिषेक असे अनेक प्रसंग मांडण्याचा एक वेगळा प्रयत्न केला आहे.

या दरम्यान त्याने विविध कलावंत मंडळी, कलाकार, राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या. ज्यात छत्रपतींना टीव्हीवर साकारणारे खासदार अमोलजी कोल्हे असतील तसेच गुरुवर्य संभाजी भिडे गुरुजी असतील रवी परांजपे सर असतील पवारसाहेब आदी अनेक दिगग्ज व्यक्तींना भेटून त्यांना ही आगळीवेगळी कालाकृती दाखवली त्यांच्या प्रतिक्रिया ऐकल्या व यानंतर पुढे संदीपची कालाक्षेत्रातली पाऊले काय आहेत त्यांची चर्चा केली. करोनाच्या काळामुळे प्रकाशनाला थोडी स्थगिती देण्यात आली होती.
पण तरीही या अमूर्त शैलीचा संग्रह लवकरात लवकर समाजासमोर आणण्याचा त्याचा प्रयत्न आहे.

सध्या त्याने एक संकल्प केला आहे ज्यात ३६५ दिवस रोज एक वेगळा गणपती रेखाटन करण्याचे त्याचे काम चालू आहे आणि आजपर्यंत १०५ एलुस्ट्रेशनस पूर्ण झाले आहेत.
युवा संदीपच समवयीन तरुणांना हेच सांगणं आहे की चांगली संधी कधी , कुठे येईल काही सांगता येत नाही त्यासाठी सदैव तत्पर रहा आणि काम करत रहा आणि इच्छाशक्ती असेल तर तुम्ही नक्कीच यश संपादन करू शकता. त्यासाठी मेहनत करा , योग्य व्यक्तींचे मार्गदर्शन मिळवा आणि कामात सातत्य ठेवा.संदीपच्या या आगळ्या वेगळ्या कलेचं आपण सर्वजण नक्कीच स्वागत कराल. अशाच या मनस्वी कलाकाराला सोशल मिररचा मानाचा मुजरा !