सकाळचे सात वाजलेत. राजेंच्या घरची बेल वाजते. बेलच्या आवाजाने अविनाश दचकून उठतो. आज परत तेच स्वप्न. श्रीमती अरुणीमा दार उघडतात.समोर दूधवाला रोजच्या नेहमीच्या वेळेप्रमाणे आलाय. 1 लिटर दुध पातेल्यात घेऊन ‘दोन दिवस येऊ नकोस, आम्ही बाहेर जातोय’ असं सांगतात.
अरुणीमा म्हणजे अविनाश विनायक राजे च्या आई. वयाची पासष्ट वर्षे झाली तरी तोच तजेलदार चेहरा आणि भारदस्त व्यक्तिमत्व. पतीचं दोन वर्षांपूर्वी निधन झालं. अविनाश एकुलता एक. साधारण चाळिशीतला. पाच वर्षांची मुलगी आणि बायको अनन्या बरोबर राहतोय. आईवर त्याचा विशेष जीव. काही दिवसांचाच असताना दत्तक घेतलेला अविनाश सावळ्या रंगाचा ,धारधार नाक आणि कपाळाला व्रणाची खूण घेऊन जन्माला आलेला.
इकडे मुलगी क्षिती वीकएंड हॉलिडे साठी आऊटिंग ला जायचं म्हणून आई बरोबर बॅग भरत्ये आणि बाबाला विचारत्ये..’बाबा हे चित्र टेबलवर होतं. तू काढलस ना ?किती छान आहे हे, कोणाचं घर आहे हे ?’ अविनाश विचारात बुडालेला असताना या प्रश्नाने भानावर येतो. ‘अं…? अगं सुचलं आपोआप.’ खरंतर या प्रश्नाचं उत्तर अविनाश किती वर्षं शोधतोय. आजही परत तेच स्वप्न. सतत स्वप्नात येणार ते एकाकी घर कोणाचं असेल? का दिसत असेल सारख स्वप्नात.??
अनन्या विचारते, ‘अवि, नक्की पुण्याला जायचं न रे, विवेक च्या घरी?’ पुण्याला पाषाणला अविनाशचा बालमित्र विवेकने नवीनच निसर्गाच्या सानिध्यात व टुमदार सोसायटीत नवा कोरा फ्लॅट घेतलाय. पण सध्या लंडनला कामानिमित्त असल्याने तो फ्लॅट तसाच पडलाय. अवि म्हणतो, ‘कुठेतरी रिसॉर्ट ला जाण्यापेक्षा तिथेच चेंज म्हणून राहु .मान्सून मध्ये पावसाला सुरुवात झाली की ढग डोंगरावर उतरतात आणि खूप मनमोहक वातावरण होऊन जातं अस विवेक कडून ऐकलंय .तिथेच जाऊ, अनु.’ क्षिती हळूच बॅगमध्ये ते चित्र भरते. खूपच आवडलंय तिला ते चित्र.
योगायोगाने अविनाशचे वडील पूर्वी पाषाण ला काही वर्षे राहायला होते. तेव्हा तीस वर्षांपूर्वी तर काहीच नव्हते. ना इमारती, ना पक्के रस्ते. नुसतं जंगल आणि मोजुन घरं. अनु सगळी तयारी करते जायची. दुर्बिण सुध्दा घेते, दूरवरच दृश्य बघायला.
दुसऱ्या दिवशी दुपारी ते पाषाणला पोहोचतात. विवेकने वॉचमनला सांगून फ्लॅट बाईकडून साफ करून ठेवलाय. विवेकचा फ्लॅट सातव्या मजल्यावर आहे. हवेशीर,भरपुर उजेड आणि अगदी पॉश. बाल्कनी छान सजवलेली वेगवेगळी झाडे आणि भिंत सुंदर पेंट केलेली. आणि बाहेरचे दृश्य तर विलोभनीय.
समोर दूरवर पसरलेली टेकडी ,आकाशात उडणारा पक्ष्यांचा थवा, सूर्याला अडवणाऱ्या ढगांचा ऊन सावलीचा खेळ आणि झाडावरच्या पक्षांचा किलबिलाट.
‘आई बाबा…ते बघा किती सुंदर घर!’ क्षिती आई आणि बाबांना हाक मारते. अवि फ्रेश होवुन बाल्कनीत जातो. बघतो तर तेच चित्रातील दृष्य! तशीच टेकडी, तेच मोठ्ठं मोकळं ,उजाड मैदान
आजूबाजूला कुंपणाला झाडं आणि टेकडीच्या पायथ्याशी घर. जीर्ण झालेलं, एकाकी शांत, भकास वाटणारं. ना कोणाचा भास ना हालचाल. क्षिती आजीकडे चित्र घेऊन जाते.’हे बघ आज्जी, बाबांनी सेम टू सेम चित्र काढलंय. गम्मत म्हणजे डोंबाऱ्याचा खेळ सुद्धा रंगला होता, चित्रासारखा प्रत्यक्षात.’
अविनाश पूर्वी इथे कधीच आला नव्हता पण स्वप्नात येतं हेच घर.
जुने ऋणानुबंध असल्याशिवाय अशा गोष्टी घडत नसतात असं आज्जी काहीतरी पुटपुटली.
रात्री 11 ची वेळ.अविनाशला अचानक जाग येते. तो तडक उठुन गेटच्या बाहेर जातो. सकाळी त्या घराची कुतूहलाने अवि आणि अनन्याने चौकशी केली तर शिरप्या नावाच्या इसमाने त्या घराबद्दल सांगितले होते.एक कुटुंब तेथे राहतं.आई बाप व 20 वर्षाचा मुलगा.आई वडील कुठेतरी शेतात काम करतात .मुलगा मंदबुद्धी म्हणून घरात एकटाच असतो. सकाळी उठून त्यांना भेटून ह्या घराचे रहस्य शोधून काढुच असं अविनाश ठरवतो.
पण अचानक रात्री त्याला जाग येते आणि जणू एक अनामिक शक्ती त्याला त्या घरापाशी खेचून नेते.
गेटच्या बाहेरपासून घरापर्यंतचा सगळा रस्ता काळोखात बुडालेला.घरात सुद्धा एक मंद प्रकाश.
अविनाश मोबाइल टॉर्च ने सगळं घर बघणार तेवढ्यात फोन वाजतो.त्या भयाण शांततेत अचानक वाजलेली फोनची रिंग कर्कश्श वाटू लागते. अविनाश दचकुन फोनच खाली टाकतो. परत उचलून बघतो तर पलीकड़ून अनन्याचा आवाज..
‘अवि कुठे आहेस?लवकर घरी ये.वॉचमन आलेत ते काहीतरी सांगतायत.’ अवि परत फिरणार तेवढ्यात ऑन झालेला टोर्चचा प्रकाश एका चेहऱ्यावर झोत टाकतो. समोरचं दृश्य बघून अविला दरदरुन घाम फुटतो. तो तेथून पळ काढतो आणि धडपडत घर गाठतो.घरी जातो तर वॉचमन नंदू आणि अनन्या त्याची वाट बघत असतात.
नंदू सांगतो..’साहेब परत त्या घरात जाऊ नका.तुम्हाला जाताना बघून अडवण्याचा खूप प्रयत्न केला. पण तुमचं लक्षच नव्हतं.एवढ्या काळोखात माझी पुढे जायची हिम्मत झाली नाही म्हणून मी लागलीच वरती आलो आणि बाईसाहेबाना तुम्हाला फोन करायला लावला .अवि म्हणतो,’अरे पण सकाळचा इसम म्हणत होता की…’ नंदू मधेच म्हणतो, ‘साहेब आधी मी काय सांगतो ऐका..
बरेच वर्षांपूर्वी गणपत , त्याची बायको यमुना आणि वीस वर्षाचा वेडसर मुलगा बबन्या राहत होते.एकदा गणपत आणि यमुना शेतात साप चावून अकस्मात मरण पावले. हा धक्का बबन्याला सहन झाला नाही, तो गप्प गप्प राहू लागला.दर रविवारी तो मैदानात डोंबा-याचा खेळ बघे आणि त्याच्या मुलाबरोबर खेळे. पण हळूहळू त्याचं वेड वाढत गेलं. डोंबा-याचा बबन्यावर जीव होता. म्हणतात ना, खुळी माणसं तेवढीच प्रेमळ असतात. बबन्याने डोंबारी आणि त्याच्या कुटुंबाला तेथेच राहू दिलं. त्याची बायको गरोदर होती तेव्हा तसंच गरिबीमुळे त्यांना ही घराचा आधार झाला . दिवसभर इकडेतिकडे खेळ आणि राहायला चार भिंती म्हणून डोंबारी खुश होता.
पण बबन्याचं वेड वाढतच होतं. शेवटी एकदा त्याने भिंतीवर डोकं आपटून जीव दिला. हे सगळं डोंबा-याच्या बायकोसमोर घडलं. तिला हे बघून एवढा मानसिक धक्का बसला की ती तारखेच्या 10 दिवस आधीच बाळंत झाली. तारीख होती 7 नोव्हेंम्बर 1985. आणि बिचारी बाळंतपणात मेली.’
‘अजूनही लक्षात आहे साहेब. माझा कामावरचा पहिला दिवस होता. तेव्हापासून डोंबाऱ्याला बबन्या घरात वावरतांना दिसू लागला आणि त्याने घर सोडण्याचा निर्णय घेतला. त्या दिवसात नवीनच पाषाणला एक ऑफिसात नोकरीवर नुकताच रुजू झालेला एक वाटसरू चुकून तेथे आला. डोंबाऱ्याने त्याला बरीच वर्ष मूळ बाळ नाही हे बघून आपलं बाळ योग्य पालनपोषण आणि भविष्यासाठी त्या भल्या माणसाच्या हवाली केलं.
नंतर तो डोंबारी आणि त्याचा 7 वर्षाचा मुलगा कोठे गेला कोणालाच माहीत नाही पण अधूनमधून बबन्याची आठवण आली की ह्या घरात एकटाच भुतासारखा येऊन बसतो म्हणतात . असंही म्हणतात, त्या बाळाच्या डोक्यावर बबन्याने मारून घेतली तशीच जन्मखूण होती .तो माणुस बाळाला मुंबईलाला बायको कडे घेऊन स्वतः एकटा इथे नोकरीसाठी राहत होता काही तीन-चार वर्षं.
हे सगळं ऐकून अविनाश च डोकं चक्रावू लागतं.
अनु नंदूला विचारते,’ मग त्या मळकट कापड्यातल्या माणसाने चुकीची माहिती का दिली आणि तो अविनाश कडे एकटक का बघत असेल ?’
नंदू म्हणतो, ‘अहो तो शिरप्या डोंबारी दिसला तुम्हाला .बबन्या आणि बायको गेल्यापासून असाच खुळ्यावानी सांगत फिरतो काय पण’.
‘ चला काळजी घ्या,’ बोलून तो निघून जातो.
अविनाश आणि अनुला धक्क्यावर धक्के बसतायत पण एका धक्क्यातून अविनाश अजूनही सावरतोय.
ते भयानक दृश्य …तो टॉर्च मधे निरागस पण तितकाच भयास्पद चेहरा ..अगदी क्षणभरच पण स्पष्ट दिसणारा ..तेच धारधार नाक माझासारखं ..तेच कपाळावरचे व्रण …माझसारखेच …म्हणजे मी….मी …7 नोव्हेंबर 1985 मध्ये जन्मलेला…डोंबऱ्याचा मुलगा…बबन्याचा पुनर्जन्म…?