sm logo new

School phobia?
शाळेची वाटते भीती…

Share

Latest

Social mirror वर आपण दोन दिवसांपूर्वी phobia अर्थात भयगंड ह्याची माहिती घेतली. मग आज शाळेच्या भितीबद्दल लिहावेसे वाटले कारण सध्या “शाळेत जात नाही, शाळेचे नाव काढले की रडतो. शाळेची भीती वाटते असे म्हणतो” असे सांगणारे पालक मुलांना घेऊन येण्याचे प्रमाण सध्या वाढले आहे. कोरोना काळात सगळ्यांत जास्त नुकसान हे मुलांचे झाले आहे. वेगवेगळ्या वयाच्या मुलांना वेगवेगळ्या अडचणी जाणवत आहेत. वाचन व लिखाणाचा वेग कमी झाला आहे. अभ्यासाला बसण्याची क्षमता कमी झाली आहे आणि त्याचबरोबर अनेक मुलांना शाळेची भीती वाटू लागली आहे.
School phobia हा भयगंड प्रकारात मोडणारी अडचण असून ह्याची काही लक्षणे खालील प्रमाणे.
१. शाळेचे नाव काढताच मुले रडतात, भोकाड पसरतात .
२. मुलांच्या पोटात दुखते, जेवण कमी होते.
३. रडून रडून मुलांना ताप येतो.
४. काही जणांना तर उलटी किंवा जुलाब देखील होतात.

ह्यात काही वेळा मुले दुखण्याचे नाटक देखील करतात पण काहींना मात्र खरोखर त्रास होत असतो. पण हे पालकांना समजले नाही तर जोरजबरदस्ती करून, तर कधी पाठीत धपाटे घालुन त्यांना शाळेत पाठवले जाते. आधीच घाबरलेली मुले आणि त्यात मनाविरुध्द शाळेत जाणे त्यामुळे ती अजूनच बिथरतात. School phobia चे खूप लहान मुलांमध्ये असणारे कारण म्हणजे separation anxiety म्हणजे खूप जवळची लोक विशेषतः आईपासून दुरावण्याची भीती. ह्यांना असे वाटते की, मी शाळेत गेल्यावर आई परत भेटणार नाही, ती कुठेतरी निघून जाईल, हरवून जाईल किंवा तिचे काही बरेवाईट होईल. ह्या विचारांनी मुले जिवाच्या आकांताने रडत असतात. काही मुले हळूहळू नवीन वातावरणाशी जुळवून घेतात, रुळतात. शाळेतील मुलांशी त्यांची मैत्री होते आणि फक्त घर हे एकच जग असलेल्यांच्या जगाच्या कक्षा रुंदावतात. त्यांच्या जगात शाळा देखील समाविष्ट होते. पण जी मुले जुळवून घेऊच शकले नाहीत त्यांच्यासाठी आपण खालील गोष्टी करू शकतो.

१. शीशू (pre primary) वर्गातील मुले जी पहिल्यांदाच शाळेत जात आहेत त्यांची आणि शाळेची भेट घडवून आणावी. शाळेचा परिसर त्यांना दाखवून आणावा. ही तुझी शाळा, हे तुमचे मैदान, ही तुमची शाळेची बाग असे सांगत शाळा दाखवून आणावी. आता तुझी किती मजा, तुला मित्र मैत्रिणी भेटणार, खेळायला भेटणार, गाणी गोष्टी ऐकायला भेटणार अशी सकारात्मक आणि उत्सुकता वाढवणारी भाषा वापरत शाळेबद्दलचे नवखेपण दूर करावे.

२. माध्यमिक शाळेतील मुलांना शाळेची असणारी भीती ही वेगवेगळ्या कारणांनी असू शकते. परीक्षा, निकाल, एखादा अवघड जाणारा विषय, मुद्दाम त्रास होईल इतपत खोड्या काढणारी मुले, कडक शिक्षा करणारे शिक्षक अशा कुठल्याही करणाची मुलांना भीती वाटू शकते. वय मोठे असल्याने त्यांना खूप रडता येत नाही, पालक समजून घेतील ह्याची खात्री नाही मग अशा मुलांमध्ये देखील भीतीपोटी शारीरिक त्रास होताना दिसून येतो. काही मुले गुपचूप सहन करत जातात आणि अजूनच बुजरी होत जातात किंवा काही मुले बंड करतात.

अशा दोन्ही प्रकारच्या मुलांना मदतीची गरज आहे. आधी पालक म्हणून आई बाबांनी, कुटुंबातील इतर सदस्यांनी मदत करावी. मोकळेपणाने संवाद साधावा. भितीदायक काही गोष्टी असतील तर त्या दूर करण्याचा प्रयत्न करावा. परीक्षा ही स्मरणशक्ती तपासण्यासाठी नसून आकलनशक्ती तपासण्यासाठी आहे ह्याचे भान आधी पालकांनी ठेवावे.

कठीण विषयासाठी मुलांना अभ्यासात मदत करावी. तुम्ही सावरायला सोबत आहे ह्याची मुलांना हमी द्यावी. पालक म्हणून मदत करताना घरगुती पातळीवर प्रश्न सुटत नसतील तर समुपदेशन, प्ले थेरपी, होमिओपॅथी, पुष्प औषधी ह्यांची देखील आपण मदत घेऊ शकता. क्लिनिकला अशा अडचणी घेऊन येणाऱ्या मुलांना होमिओपॅथी आणि bach flower remedy सोबतच समुपदेशनाची देखील फार गरज जाणवते. पालक आणि मुले दोघांनाही ह्याची गरज आहे. पालक, मुले, डॉक्टर ह्यांनी एकत्रित काम केले तर खूप लवकर मुले ह्या भयगंडातून बाहेर पडतात.
एकदा की त्रासदायक, भितीदायक वाटणाऱ्या गोष्टींशी मुलांनी जुळवून घेतले की मग शाळा आणि अभ्यास जाच न वाटता आनंद देणारी गोष्ट ठरेल आणि त्यांचा शैक्षणिक प्रवास सुखाचा आणि आनंद देणारा होईल.

FOR YOU