sm logo new

कंबरदुखी करी हैराण… | Worries about Back pain

social mirror back pain
social mirror back pain

Share

Latest

घरगुती कार्यक्रम, किंवा सणासुदीला कंबर कसून काम करणाऱ्या बायका, आणि अत्यंत दुःखद प्रसंगी कंबर खचली म्हणतो आणि नृत्याविष्कार करताना कंबर लचकवल्याशिवय तो आविष्कार पूर्ण झाल्यासारखे वाटत नाही. लहान मूल, पाण्याचा हंडा देखील कंबरेवर घेतले जातात.
विनोदाचा भाग सोडला तर
९०% स्त्रियांना एकदा तरी भेडसावणारा छळवादी त्रास म्हणजे कंबरदुखी, वरवर पाहता किरकोळ वाटणारी ही कंबरदुखी जेव्हा उग्र रूप धारण करते तेव्हा प्रत्येकाला त्या दुखण्याचं गांभीर्य जाणवते व प्रकर्षाने उपाययोजना करण्यासाठी धडपड सुरू होते. खरं तरं व्यायाम अथवा योगासने केली तर अशा दुखण्यापासून सुटका मिळू शकते, पण व्यायाम ही ऐच्छिक बाब असल्याने कुणीच त्याचा गांभिर्याने विचार करत नाही पण दुखणे अंगात मुरले आणि वेदनांचा मारा असह्य झाला की आपण भानावर येतो म्हणून वेळ जाण्यापूर्वीच ह्या कंबरदुखीपासून सुटका करून घ्यायला हवी.

कंबर दुखीचे प्रकार आणि करणे

१. तात्पुरती / अचानक उद्भवलेली कंबरदुखी

जड ओझे उचलणे, कंबरेस अचानक हिसका बसणे, उसण भरणे, जड वस्तू अंगावर पडणे, लहान अपघातात कंबरेस होणारी दुखापत ह्या कारणांमुळे अचानकपणे कंबरदुखीचा त्रास उद्भवू शकतो.

२. दिर्घ काळापासूनची कंबरदुखी:-

  • स्पॉन्डायलोसिस
    कंबरेच्या मणक्यांची झीज होऊन एखादा मणका पुढे मागे सरकणे.
  • स्लिप डिस्क
    दोन मणक्यांमधील चकतीची वयोमानानुसार झीज होत जाते, तसेच कंबरेस मार लागल्यास ती फाटू शकते, त्यामुळे देखील कंबरदुखी होवू शकते.

३. उठण्या बसण्याची पध्दत:-

चुकीची बसण्याची पध्दत हे कंबरदुखीचे सर्वात प्रमुख कारण आहे. खुर्चीत जास्त वेळ बसताना पाठीस आधार न घेता पोक काढून बसल्याने किंवा सोफा आराम खुर्चीत एका बाजूला झुकून एकाच खुब्यावर भार देवून बसणे. पोट पुढे उभे राहणे विशेषतः स्वयंपाक करताना स्त्रिया पोट पुढे काढून म्हणजे स्वयंपाक ओट्याच्या दिशेने, पोट ओट्याला टेकवून उभे राहतात. त्यामुळे जुनाट कंबरदुखी वाट्याला येते.

काही कारणाने मणक्याच्या बाजूचे स्नायू जर दुखावले गेले असतील किंवा त्यांना इजा झाली असेल तरीदेखील दीर्घकाळ कंबरदुखी होऊ शकते.

इतर कारणे:-
शरीरात इतर अवयवांमधील बिघाड जसे गर्भाशयाचे आजार , उदाहरण गर्भाशयात विशिष्ट ठिकाणी असणारे fibroid च्या गाठी.
PID म्हणजे पेलविस मध्ये असणारा जंतुसंसर्ग,
वेदनादायक मासिक पाळी. गर्भारपणातील व रजोनिवृत्ती नंतर जडणारी कंबरदुखी,
प्रसूती व इतर कारणांमुळे करण्यात आलेल्या शत्रक्रियेनंतर सुरू होणारी कंबरदुखी,
शरीरात असणारे कॅल्शियम आणि व्हिटॅमिन D3 ह्याची कमतरता.

इ.मानसिक ताणतणावः– मानसिक ताणतणाव, जुने विचार, चिंता हे सुध्दा कंबरदुखीचे कारण असू शकते.

कंबरदुखी टाळण्यासाठी आपण काय करू शकता?
सर्वात महत्त्वाचे म्हणजे बसण्याची योग्य पध्दत, पाठीला नेहमी आधार देऊन बसावे. शक्यतो पाठ म्हणजे पाठीचा मणका सरळ असावा.
उभे राहताना कंबरेचे मणक्यांना पुढच्या दिशेने पोक न काढता म्हणजे पोट पुढे काढून उभे राहू नये.
बसण्यासाठी योग्य फर्निचरचा वापर करावा.
अंथरूण खूप कडक किंवा खूप नरम नसावे.

कंबरदुखीतील प्रथमोपचार…
१) शेक- बर्फाने अथवा गरम पाण्याने (जे सहन होत असेल त्याने, दुखणे तत्काळ आहे की जुने ह्यावर ठरवावे.) १०-१५ मि. शेकणे.
२) व्यायाम- कंबरेच्या स्नायूंना ताण मिळेल असा एवढाच व्यायाम करावा व वेदना कमी झाल्यावर हळूहळू वाढ करावी. व्यायामामुळे शरीरामध्ये ‘एन्डॉरफिन्स’ नावाचे वेदनाशामक द्रव्य निर्माण झाल्याने औषधांची गरज कमी होते.

त्रास होताना पाळावयाची पथ्येः-
खाली वाकून जास्त वेळ काम टाळावे, वस्तू उचलताना कंबरेत वाकण्याऐवजी गुडघ्यात वाकून वस्तू उचलावी, जड वस्तू एकाच हाताने जास्त वेळा उचलू नये, दोन्ही हातात समसमान वजन उचलावे.
एकाच जागेवर जास्त वेळ बसण्याऐवजी अधून मधून १-२ मि. उठून उभे राहावे.

फायदेशीर योगासनेः-
कंबरदुखी टाळण्यासाठी भुजंगासन, हलासन, शलभासन, धनुरासन ह्यांचा देखील खूप चांगला फायदा होतो. ही आसने तज्ञ व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली करावी.
कंबरदुखी सोबत पायांना मुंग्या येणे, पाय बधीर होणे, एका रांगेत कंबरेपासून घोट्यापर्यंत वेदना होणे, अतितीव्र वेदना असतील तर आपण फिजिओथेरपी आणि अस्थीरोगतज्ञ यांचा सल्ला जरूर घ्यावा. त्यांनी दिलेली औषधे तर घ्यावीच पण सर्वात महत्वाचे म्हणजे व्यायाम नियमित करावा.

वरील सर्व सांगितलेल्या गोष्टीचे काटेकोर पालन करत कंबरदुखीला कायमचा राम राम ठोकुया!

FOR YOU